गोरगरीबांना महागाईमुळे सणासुदीच्या काळात मनासारखे खाद्यपदार्थ खरेदी करता येत नाहीत. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांचा सण आनंदात जावा, यासाठी राज्य शासनाने उपलब्ध केलेला आनंदाचा शिधा प्रत्येक घरामध्ये आनंदाचा मळा फुलवेल, असे उद्गार खासदार धनंजय महाडिक यांनी काढले. गणेशोत्सवानिमित्त राज्य शासनाकडून दिल्या जाणार्या आनंदाच्या शिधाचं कोल्हापूर जिल्हयात वितरण करायला गुरूवारपासून खासदार धनंजय महाडिक आणि सौ. अरूंधती महाडिक यांच्या हस्ते सुरूवात झाली, त्यावेळी ते बोलत होते.
राज्य शासनाने अंत्योदय, केशरी आणि पिवळे रेशन कार्ड असणार्यांना, आनंदाचा शिधा देण्याचा उपक्रम गेल्या वर्षीपासून सुरू केलाय. साखर, रवा, चणाडाळ, खाद्य तेल या चार वस्तू प्रत्येकी एक किलो प्रमाणात असणारे किट, केवळ शंभर रुपयात, रेशन कार्ड धारकांना दिले जातेय. यंदाच्या गौरीगणपती आणि दिवाळी सणासाठी, आनंदाचा शिधा देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील बहुतांश रेशन दुकानात आनंदाचा शिधा प्राप्त झालाय. खासदार धनंजय महाडिक आणि सौ. अरूंधती महाडिक यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा असलेले कीट देण्यात आले. शासनाने सणासुदीच्या निमित्ताने आनंदाचा शिधा देण्याचा उपक्रम राबवून राज्यातील जनतेचा आनंद द्विगुणित केलाय, असे उद्गार खासदार धनंजय महाडिक काढले. यावेळी रेशनधान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे, अरूण शिंदे, गजानन हवालदार, सुनील दावणे, पांडुरंग सुभेदार, संजय केंगार, मारूती पाथरवट, सागर मेढे, सरिता हारूगले यांच्यासह धान्य दुकानदार उपस्थित होते.