कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी – सुविधांचा बोजवारा उडाला आहे. गेल्या काही महिन्यात शहरातील महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न वारंवार ऐरणीवर येत आहे. बहुतांश स्वच्छतागृह बंद अवस्थेत आहेत. तर सुरु असलेल्या स्वच्छतागृहात अस्वच्छता, खंडित पाणीपुरवठा, लाईट, नादुरस्त दरवाजे आदीमुळे महिला भगिनींची अत्यंत गैरसोय होत आहे. त्यातच गेल्या महिन्यात संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे स्वच्छतागृहात गेलेल्या महिलेचा खासबाग मैदानाची भिंत कोसळून मृत्यू झाला हि बाब अत्यंत दुर्दैवी आहे. महानगरपालिका प्रशासनाचे स्वच्छतागृह सुस्थितीत असते, तर एका महिलेचा नाहक बळी गेला नसता. त्यातच कोल्हापूर शहरातील आई अंबाबाई मंदिरास भेट देण्याऱ्या महिला पर्यटकांची संख्याही दिवसगणिक वाढत. आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव काळात महिला भाविकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ शहरात महिला भाविकांसाठी ई- टॉईलेट उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आज शिवसेना महिला आघाडीच्या वतीने महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे करण्यात आली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे सादर केले.
या निवेदना मध्ये कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने महिलां वर्गाची होणारी गैरसोय लक्षात घेवून तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. शहरातील सर्व महिला स्वच्छता गृहांचा प्रशासनाने सर्व्हे करावा. मोडकळीस आलेले स्वच्छतागृह तात्काळ दुरुस्त करण्यात यावेत, स्वच्छतागृहांचे आधुनिक डिझाईन तयार करून त्यापद्धतीने शहरात श्री अंबाबाई मंदिर परिसर, रंकाळा तलाव, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रंकाळा बसस्थानक, कपिलतीर्थ मार्केट, लक्ष्मीपुरी गंगावेश शाहू उद्यान भाजी मंडई, पंचगंगा नदी, दसरा चौक, राजारामपुरी आदी शहरातील महत्त्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी नव्याने स्वच्छतागृह बांधण्यात यावीत. यामध्ये मुबलक पाणी पुरवठा, लाईट आदींची व्यवस्था करण्यात यावी. सर्वच स्वच्छतागृहात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दरवाजे, खिडक्या आदींची रचना करण्यात यावी. स्वच्छतागृहांची स्वच्छता करणाऱ्या महानगपालिका कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने स्वच्छतागृहातील स्वच्छतेचा दर्जा खालावत चालला आहे. याठिकाणच्या दुर्गंधीमुळे महिलांना त्याठिकाणी जाणे अशक्य बनले आहे. त्यामुळे तात्काळ सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या नियमित स्वच्छतेसाठी आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत. सफाई साठी आवश्यक साहित्यांचा दर्जा चांगला असावा. व्यावसायिक इमारतींमध्ये स्वच्छतागृह असणे बंधनकारक आहे. तरीसुद्धा अनेक ठिकाणी ते बंद अथवा अस्वच्छ असल्याचे निदर्शनास येते. अशा व्यावसायिक इमारतीमधील स्वच्छतागृहे खुली करून त्यांच्या स्वच्छतेबाबत संबधित व्यवस्थापनाला नोटीस बजावण्यात याव्यात. स्वच्छतागृहांचे दिशादर्शक फलक बंधनकारक करण्यात यावेत. जेणेकरून प्रवासी महिला पर्यटकांची गैरसोय होणार नाही. महानगरपालिकेचे अनेक ई- टॉईलेट बंद अवस्थेत असून, त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे तात्काळ बंद असलेले ई- टॉईलेट दुरुस्त करून उपलब्ध करून देण्यात यावेत. या ई- टॉईलेटचे दरवाजे, जिना, लाईट व्यवस्था सु-स्थितीत असावी. यासह या ई- टॉईलेटच्या जिना व बॅरॅकेटिंगला स्पर्श झाल्यास लाईटचा शॉक लागण्याचे प्रकार अनेकदा घडत आहेत. त्यामुळे त्याची दखल घेवून तात्काळ आवश्यक उपायोजना करावी. कोल्हापूर महानगरपालिकेने सी.एस.आर. फंड वापरून बस टॉईलेट बनवले होते. परंतु, या बस टॉईलेट विनावापर पडून असल्याचे दिसत आहे. शहरातील बाजार, सार्वजनिक उत्सव, शाळा, महाविद्यालय, महिला वर्दळीच्या ठिकाणी बस टॉईलेट चा वापर तात्काळ सुरु करण्यात यावा. त्याकरिता आवश्यक शेड्युल बनवून सार्वजनिक करण्यात यावे. आगामी महानगरपालिका अर्थसंकल्पात महिला स्वच्छतागृह उभारणे, देखभाल दुरुस्ती, साफसफाईसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या महानगरसमन्वयक पूजा भोर, युवती सेना शहर अधिकारी नम्रता भोसले, संघटिका अमरजा पाटील, पूजा कामते, सुनिता भोपळे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.