किशोरवयीन प्रेमाची गंमतीशीर प्रेमकथा सांगणार ‘आत्मपॅम्फ्लेट’६ ॲाक्टोबरला होणार प्रदर्शित

७३ वा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झालेल्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाचे टिझर नुकतेच प्रदर्शित झाले असून हे भन्नाट टिझर आहे. ‘वाळवी’च्या भव्य यशानंतर परेश मोकाशी पुन्हा एकदा एक नवीन लेखन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाचे नाव वेगळे आहे त्यामुळे ‘आत्मपॅम्फ्लेट’ म्हणजे काय याचे उत्तर प्रेक्षकांना ६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात मिळेल. गुलशन कुमार, टी सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित ‘आत्मपॅम्फ्लेट’चे भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल. राय, कनुप्रिया ए. अय्यर, मधुगंधा कुलकर्णी आणि झी स्टुडिओज निर्माते आहेत. त्यामुळे या चित्रपटाशी अनेक नामवंत नावे जोडली गेली आहेत.

दिग्दर्शक आशिष अविनाश बेंडे म्हणतात, ” चित्रपटाचे नाव असे का आहे, ते टिझरमध्ये स्पष्ट कळत आहे. खूप साधी, सरळ आणि मनाला भावणारी अशी ही कथा आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण कोरोनाच्या काळात झाले होते. त्याचबरोबर इतर असंख्य आव्हानं असतानाही चित्रपटाच्या टीमने मनापासून काम केले आणि चित्रपट पूर्ण केला. चित्रपटाने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावली आहे. याचे सारे श्रेय संपूर्ण टीमचे आहे. ‘आत्मपॅम्फ्लेट’मधील पात्रांपैकी एखादे पात्र तरी बालपणी आपल्यात, आपल्या मित्र मैत्रिणीत दडल्याचे प्रेक्षकांना जाणवेल. एखाद्या फास्ट रोलर कोस्टर राईडसारखी, तिरकस विनोदी शैली चित्रपटाची आहे. सर्व वयोगटासाठी हा चित्रपट आहे.”

चित्रपटाचे लेखक परेश मोकाशी म्हणतात, ‘आत्मपॅम्फ्लेट म्हणजे आपल्या शालेय आयुष्यात, क्वचितच येऊन गेलेला सोप्पा पेपर आहे. आपल्यासारख्या छोटुकल्या लोकांच्या चरित्रातील ही टीन ऐजची पाने तशी खूप खळबळजनक असतात. त्या वयात आपल्या मनात, जनात, कुटुंबात, देशात खळबळच खळबळ उडालेली आपल्याला दिसत असते. या खळबळीचा हा निखळ आनंद देणारा खेळ!”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top